राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अशातच रविवारी त्यांच्या बाबतीत आणखीन एक धक्कादायक प्रकार घडला. एका अज्ञात व्यक्तीकडून अजित पवार यांचा फोन हॅक करून त्याच नंबर वरून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र राणे यांना कॉल करण्यात आला होता. या अज्ञाताने राणे यांच्याकडे अजित यांच्या नावे पैशांची मागणी केली. खरंतर अजित पवार यांच्याच नंबर वरून कॉल आल्याने राणे यांनी सुद्धा तातडीने पैशांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली मात्र त्यानंतर अजित यांच्याशी थेट संपर्क करताच हा सर्व बनाव उघड झाला.
नरेंद्र राणे यांच्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी अजित पवार यांच्या नंबर वरून कुणाल नामक एका इसमाने कॉल केला होता. "अजित दादा सध्या पुण्यात आहेत, मात्र एका व्यक्तीला मुंबईत तातडीने मोठी रक्कम अदा करायची आहे. तुम्ही या बँक खात्यावर इतकी इतकी रक्कम तत्काळ भरण्याची व्यवस्था करा" असे या कॉल वरून सांगण्यात आले होते. हा निरोप ऐकताच सुरुवातीला राणे यांना शंका आली कारण या आधी अजित पवार यांनी कधीही अशा प्रकारे फोन करून पैशांची मागणी केली नव्हती, मात्र तरीही नंबर सारखाच असल्याने त्यांनी पैशांची जमवाजमव करण्यासाठी वेळ मागून घेतला व आपल्या शन्केचे निरसन करण्यासाठी अजित यांच्या जवळच्या सहकाऱ्याला कॉल करून याबाबत विचारणा केली.
दरम्यान, अजित पवार यांनी 'मी तुम्हाला फोन केलेलाच नाही, माझा फोन माझ्याकडे आहे. कोणत्या पैशाचे बोलता,' असा प्रतिप्रश्न केला.साहजिकच यांनतर हा कॉल खोटा असल्याचे समजले ज्यानंतर नरेंद्र राणे यांनी यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली असून फोनचे सर्व कॉल डिटेल्स दिले आहेत. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अद्याप हा फोन कोणी केला याबाबत तपास लागलेला नाही.