राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही याबाबतच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी घडल्या प्रकाराबद्दल निशेध व्यक्त केला आहे. राज्यात लोकशाहीला अनुसरुन काम होताना दिसत नाही. एका बाजूला पालकमंत्री नेमले नाहीत. काही ठिकाणी पालकमंत्री नेमलेत त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी झेंडावंदन केले. मात्र, स्वातंत्र्य दिनी अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याला झेंडावंदन करावे लागले, ही बाब लोकशाहीला धरुन नाही, असेही अजित पवार म्हणाले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जनावरांना होणाऱ्या लिम्पी (Lumpy Skin Disease) आजारांवरुनही अजित पवार यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले.
अजित पवार यांनी पालकमंत्री या मुद्द्यावर सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सरकार सत्तेत आल्यानंतर काही दिवसांमध्येच जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमावे लागतात. पण, दुर्दैवाने या सरकारला पालकमंत्री नेमण्यासाठी काय अडचण आहे तेच समजत नाही. पालकमंत्री नसल्याने सरकारद्वारे मंजूर करण्यात आलेला निधी खर्च करण्यास अडचण येते. हा निधी वेळेत खर्च नाही झाला तर तो परत जातो. त्यामुळे या सरकारला जनतेप्रति नेमके काय काम करायचे आहे याबाततच प्रश्नचिन्ह उपस्थित होते, असेही अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, Praful Patel On Sharad Pawar: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य; 'शरद पवार विरोधी चेहरा आणि पंतप्रधानपदाचे उमेदवारही नसतील')
राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि जनतेचे प्रश्न यावरुन बोलताना अजित पवार म्हणाले. गणपती उत्सवात राज्य सरकार अकंट बुडालेले दिसले. पाठिमागील दहा दिवसांमध्ये राज्य सरकार प्रामुख्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे केवळ गणपती दर्शन करण्यातच व्यग्र होते. त्यांना राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नसल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यातील अनेकांनी पदभारच स्वीकारला नाही. तर काहीजण मिळालेल्या मंत्रिपदावरुन नाराज आहेत, अशी सगळी अवस्था असताना राज्याचा कारभार चालणार तरी कसा हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे अजित पवार म्हणाले.
असेही कानावर येत आहे की, सध्या पितृपंधरवडा सुरु असल्याने अनेकांनी पदभार स्वीकारण्यास आणि महत्त्वाची कामे करण्यास नकार दिल्याचे समजते. खरे तर आज जग कुठे चालले आहे आणि हे लोक कशात अडकले आहेत पाहा, असे म्हणत अजित पवार यांनी विद्यमान सरकारवर टोलेबाजी केली. राज्यमंत्रिमंडळ विस्तार केल्यास किंवा पालकमंत्री नेमल्यास नाराजी मोठ्या प्रमाणावर उफाळून येईल, याची भीती असल्यानेच मंत्रमंडळ विस्तार, अथवा किंवा पालकमंत्री नेमण्याची तसदी घेतली जात नसल्याचा टोलाही अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावला.
दरम्यान, सध्या राज्यभर चर्चेचा विषय असेलेला लिम्पी हा जनावरांचा आजार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्य सरकारने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करावी. हा आजार जनावरांना होत होतो आहे. मानवाला होत नाही. परंतू, हे मी सांगून चालणार नाही. याबाबत जबाबदार अधिकारी, संबंधीत खात्याचा मंत्री किंवा मुख्यमंत्री महोदयांनी यावर भाष्य करावे. हा आजार विमा सुरक्षेत येत नाही. त्यामुळे या आजाराने जनावर दगावले तर त्या शेतकऱ्याला विमा संरक्षण मिळावे किंवा राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी, याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले.