
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सत्तेच्या समीकरणासाठी नवी समिकरणं जुळताना दिसत आहेत. पण या खेळात अनेक कुटुंबांमध्येही नाती देखील पणाला लागताना दिसणार आहेत. देशात लोकसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. अद्याप तारखा, उमेदवार, आचारसंहिता जाहीर झाली नसली तरीही सारेच पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) मागील 15 वर्ष बारामतीचं प्रतिनिधित्त्व करत आहेत. यंदाच्या लोकसभेतील रणधुमाळीची सुरूवात होण्यापूर्वीच पवार कुटुंबामध्ये तयारीला सुरूवात झाली आहे. शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाल्यानंतर निवडणूकीच्या रिंगणात ते पहिल्यांदाच आमने सामने दिसणार आहेत. अशात आज अजित पवारांच्या सख्ख्या भावाच्या मुलाने शरद पवारांच्या कार्यालयात हजेरी लावल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांचा लेक युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आज बारामती मध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सावध भूमिकेत दिसले.
युगेंद्र यांनी शरद पवार यांच्या पारड्यात आपलं वजन टाकल्याने अजित पवार कुटुंबात एकटे पडणार का? अशी चर्चा रंगायला लागली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द अजित पवारांनीच आपल्या घरातील व्यक्तींशिवाय कुटुंबातील लोकंही मला पाठिंबा देणार नसल्याचं बोलून गेले होते. त्यामुळे आता युगेंद्रच्या भूमिकेकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. आज युगेंद्र यांनी अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाही. निवडणूकांना अजून किमान महिनाभराचा वेळ असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे लढती बद्दलही त्यांनी आत्ताच थेट बोलणं टाळलं आहे. पण सुप्रिया सुळेंच्या प्रचारात ते उतरणार आहेत. NCP vs NCP in Baramati: सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार देणार तगडा उमेदवार, अनुभव नसला तरी दिग्गजांचा पाठींबा .
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. हायस्कूल शिक्षणापासून सुमारे 8 वर्ष ते युरोप, अमेरिकेमध्ये राहिले आहेत. तत्पूर्वी मुंबई, पुण्यात त्यांचे शिक्षण झाले आहेत. बारामती मध्ये लोकांसोबत काम करतात. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, बारामतीच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, शरयू उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सोबतच ते जलसंधारण, ओढा खोलीकरण, पर्यावरण समृद्ध राहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात सीडबॉल निर्मितीच्या उपक्रमात योगदान देतात. भविष्यात राजकारणामध्येही तळापासून कामाला सुरूवात करायला आवडेल असे आज युगेंद्र म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या राजकीय प्रवेशाचे स्वागत केले आहे. युगेंद्र यांनी देखील शरद पवार जी जबाबदारी सोपवतील ती पार पाडायला आवडेल असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अजून एका पवारांचा प्रवेश होतोय का? या चर्चांना उधाण आलं आहे.