शिवसेना पक्षाने सरकार स्थापनेचा दावा करूनही त्यांच्याकडे बहुमत नसल्याने आता राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर अधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भेटीस बोलावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली असून, राज्यपालांनी नक्की कोणत्या कारणासाठी त्यांना बोलावलं आहे हे माहित नसल्याचे सांगितले.
ते म्हणाले, "मी राष्ट्रवादीचा विधिमंडळ नेता असल्याने मला राज्यपालांचा फोन आला होता. परंतु मी काही बातम्या अशा ही ऐकल्या की सत्ता स्थापनेचे निमंत्रण राष्ट्रवादीला मिळाले आहे. परंतु राज्यपाल मला तसं काहीच बोलले नाहीत. त्यामुळे नक्की या भेटीचं काय कारण आहे ते अद्याप मलाही माहित नाही."
अजित पवार राज्यपालांच्या भेटीला एकटे जाणार नसून छगन भुजबळ, जयंत पाटील आणि इतर बड्या नेत्यांसोबत जाणार आहेत.
परंतु राज्यपाल खरंच राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेची संधी देतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. तसं झाल्यास शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ शकतील का हे ही तितकंच महत्त्वाचं असेल. तसं झाल्यास शरद पवार हेच सध्याच्या राजकारणाचे किंगमेकर ठरतील असं बोलणं वावगं ठरणार नाही.