Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

एआयएमआयएम (AIMIM) खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला युतीची ऑफर दिली. त्यानंतर शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाच्या विविध नेत्यांनी एमआयएमसोबत युती होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रथमच याबाबत भूमिका मांडली आहे. एमआयएम हा पक्ष म्हणजे भाजपची 'टीम बी' आहे. शिवसेना आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठीच भाजपच्या आदेशामुळे एमआयएमने महाविकासआघाडीला ही ऑफर दिली आहे. केवळ सत्ता तर सोडाच परंतू कोणत्याही कारणास्तव एमआयएमसोबत शिवसेना युती करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना शिवसंपर्क अभियान राबवत आहे. या अभियानाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केले. या वेळी त्यांनी एमआयएमची ऑफर म्हणजे भाजपच्या व्यापक कटाचा भाग आहे, असे म्हटले. हा कट शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी उधळून लावायचा आहे, असे अवाहनही उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले. भाजप नेहमी विरोधकांना बदनाम करण्यासाठी लोकांमध्ये संभ्रम तयार करतो. लोकांमध्ये अनामिक भीती निर्माण करतो. त्यातूनच एमआयएमकडून ऑफरचा मुद्दा पुढे आला आहे. भाजपच्या आदेशानुसारच एमआयएमने ही ऑफर केली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, NCP Leaders On AIMIM Alliance: एमआयएम-राष्ट्रीवादी युतीची चर्चा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी दिल्या प्रतिक्रिया)

'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो गुंड' अशी भाजपची वृत्ती आहे. भाजपने जर मुस्लिमांबद्दल काही म्हटले तर ते देशहिताचे आणि इतरांनी बोलले तर तो देशद्रोह असतो का? असा सवाल उपस्थित करतानाच भाजपने जम्मू-कश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे भाजपने मुफ्तींसोबत थाटलेला संसार विसरु नका, अशी आठवणही ठाकरे यांनी करुन दिली. राज्यात महाविकासआघाडी म्हणून आपण एक आहोत. महाविकासआघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. त्यामुळे राज्यात महाविकासआघाडी घट्ट आहे. येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार राहण्याचे अवाहनी उद्धव यांनी शिवसैनिकांना केले.