Trupti Desai Against Indurikar Maharaj (Photo Credits: File Image)

ह. भ. प इंदूरीकर (Indurikar Maharaj) महाराज यांनी कीर्तनात संतती निर्मिती वरून केलेल्या दाव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा त्यांच्या अकोले (Akole) येथील आश्रमात जाऊन त्यांच्याच तोंडाला काळे फासु अशी आक्रमक भूमिका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai)  यांनी घेतली आहे. आज , 18 फेब्रुवारी रोजी त्यांनी अहमदनगर (Ahmednagar) मध्ये जाऊन इंदुरीकर महाराजांच्या विरुद्ध रीतसर तक्रार केली आहे, दरम्यान, याप्रकरणात आणखीन गुंतण्याऐवजी इंदुरीकर महाराजांनी काढता पाय घेत आज आपल्या विधानावरून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती, मात्र इंदुरीकरांच्या माफीनाम्याचे स्वागत आहे मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा अशी ठाम भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात "समतिथीला स्त्री संग केल्यास मुलगी आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो" असे विधान केले होते, वास्तविक आपले हे विद्धान हे अभ्यासानुसार आहे असे मत इंदुरीकर यांनी अजूनही मागे घेतलेले नाही मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे म्हणत जर का कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा पवित्रा त्यांनी आज जाहीर केला होता. मात्र इंदुरीकर महाराज महिलांबद्दल जे काही बोलत आहेत ते चुकीचे असून , त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत, त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे असे म्हणत तृप्ती देसाई यांनी मात्र माघार घेण्यापासून नकार दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सहित काही राजकारणी मंडळी इंदुरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी हे बंद करावे, अन्यथा त्यांनाही मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू, असे देसाई यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी नगर मध्ये जाण्याची घोषणा करताच "नगरमध्ये आलीस तर तुला तुझी लायकी दाखवून देईन" असा इशारा शिवसेना कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र आज दुपारीच पोलिसांनी आष्टेकर यांना ताब्यात घेतल्याने प्रत्यक्षात तृप्ती यांना कुणीही अडवले नाही. असं असलं तरी तृप्ती यांच्या गाडी समोर सुप्याजवळ वारकरी संघटनांच्या काही सदस्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला होता.