(प्रतिकात्मक प्रतिमा)

शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन चक्क एका महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असलेल्या भानगाव येथे ही घटना घडली. ही महिला विशिष्ट समाजातील असून, दि. १२ सप्टेंबर रोजी तीची शेळी दुपारी तीनच्या दरम्यान एकाच्या शेतात गेली. याचा राग मनात धरुन तिला आणि तिच्या पतिला लाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच, महिलेच्या अंगावरील कपडे ओढून तिला विवस्त्र करुन मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन तिच्यासोबत केले गेले.

पीडित महिलेने १४ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरुन श्रीगोंदा पोलिसांनी शेतमालक जयसिंग वागस्कर, संतोष वागस्कर, मनोहर वागस्कर, जेसीबीवाला(सर्व रा सुरोडी, ता श्रीगोंदा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांवर मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १२ सप्टेंबरला ही घटना घडली त्या दिवशी ती साधारण दुपारी तीनच्या सुमारास भानगाव शिवारात शेळ्या चारत होती. दरम्यान, तिची शेळी रानातील पिकात गेली. रानात शेळी गेल्याचा राग मनात धरुन जयसिंग वागस्कर, संतोष वागस्कर, मनोहर वागस्कर, जेसीबीवाला लुटे यांनी तक्रारदार महिला व तिच्या पतीला मारहाण केली. तसेच, तुम्ही आमचे काहीच करु शकत नाही. असे उद्गार काढत जातीवाच शिवगाळ करुन मारहाण केली. मारहाण करताना त्यांनी अंगावरील कपडे फाडले व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, भरत वागस्कर यांनीही १२ सप्टेंबरला तक्रार दिली आहे. या तक्रारीत पीडित महिला आणि तिच्या पतींवर आरोप करण्यात आले आहेत.