Ahmednagar: संतापजनक! महिला सरपंचाला लाथांनी मारहाण, शिवीगाळ; केली न्यायाची मागणी, Rupali Chakankar यांनी शेअर केला व्हिडिओ
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अहमदनगर (Ahmednagar) येथे महिला सरपंचाला मारहाण व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे गावात वाद होऊ नये म्हणून तंटामुख्ती समिती स्थापन करण्यात येते, याच समितीच्या अध्यक्षीय वादावरून ही संतापजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून, जिल्ह्यातील उक्कडगावच्या या सरपंच महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. याआधी पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती, त्यानंतर आता या समोर आलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचं प्रकरण समोर आला आहे.मी स्वतः नगर पोलीस आयुक्तांशी बोलले आहे.आरोपींवर कडक कारवाई व्हावी, या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा.’ चाकणकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, महिला सरपंचांनी ग्रामसभेत आलेला अनुभव कथन केला असून, आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून देखील अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण –

सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे 8 सप्टेंबर रोजी गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवड सुरु होती. गावात ग्रामसभा चालू असताना त्यांनी तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडला. समोरच्या पार्टीला तो मान्य नव्हता. त्यांनी आरडाओरडा केला. सरपंचांनी सभा तहकूब करून त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला. बहुमताने आपण अध्यक्ष निवडू, असेही सांगितले. पण तेही त्यांना मान्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी जास्त आरडाओरडा केला. (हेही वाचा: Mumbai Rape: मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात घातला लोखंडी रॉड, पीडिताची प्रकृती चिंताजनक)

पुढे त्यांनी सांगितले, या गोंधळानंतर जेव्हा त्या कार्यालयाकडे निघाल्या तेव्हा भाजपच्या गुंडांनी त्यांना पाठीमागून लाथ मारली, शिवीगाळ केली, लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक केली. आपल्या मदतीला येणाऱ्या लोकांनाही मारहाण केली. नंतर पोलिस ठाण्यातही आपल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तिथे मला 2 ते 4 तास बसवून ठेवण्यात आले, असा दावा या महिला सरपंचांनी केला आहे.