BMC | Photo Credits: File Image

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपा- शिवसेनेला मतदारांचा कौल मिळाला असला तरीही सत्ता कोंडी कायम आहे. 'मुख्यमंत्रीपदा'वरून महायुतीमध्ये तणाव असल्याने आता त्याचे पडसाद मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकांमध्येही पहायला मिळणार आहेत. आज भाजपा आमदार आशिष शेलार यांनी भाजपा मुंबई महापौर पदाच्या निवडणूकीतून बाहेर पडत असल्याच्या आशयाचे एक ट्वीट केले आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विट मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही तुल्यबळ आहोत पण संख्याबळ नसल्याने उतरणार नसल्याचं ट्विट केलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक 22 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. तर आज (18 नोव्हेंबर) ही महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मुंबई महापौर पदाच्या निवडणूकीतून भाजपची माघार.

आशिष शेलार यांचं ट्वीट

मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही... मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. महापौर पदासाठी शिवसेनेला शह देण्यासाठी इतर कोणत्याच पक्षाची मदत घेणार नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. (Mayoral Reservation: मुंबई महापौर पद पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव)

सध्या मुंबईच्या महापौर पदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे आहेत. त्यांचा कार्यकाल लवकरच संपणार असून त्यांच्या जागी नव्या महापौराची निवड होणार आहे. यंदा देखील खुल्या प्रवर्गासाठी महापौर पद जाहीर झाल्याने अनेकांनी या पदासाठी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. परंतू अद्याप 145 हा बहुमताचा आकडा कोणताच पक्ष गाठू न शकल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सध्या 25 वर्षाची युती बाजूला ठेवत शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.