महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना- भाजपाच्या महायुतीचंं सरकार येणार- देवेंद्र फडणवीस यांचा दावा
CM Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी संघर्ष शिगेला पोहचला आहे.मतदारांनी सर्वाधिक म्हणजेच 105 जागा भाजपा पक्षाला मिळाल्या असून शिवसेनेला 56 विधानसभा मतदार संघांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळे महायुती पुन्हा सत्तेत येणार का? हा प्रश्न मतदारांना पडला आहे. आज भाजपाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती झाली आहे. यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महराष्ट्रात 'महायुती'चंच सरकार येणार असा दावा केला आहे.  भाजप-शिवसेना युतीचा नवा फॉर्म्युला 13-26? मुख्यमंत्री, गृह, अर्थ, नगरविकास मंत्रालयं सोडून इतर पदांबाबत चर्चा होण्याची शक्यता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानुसार, विधीमंडळ नेतेपदी त्यांची निवड केल्याप्रकरणी सार्‍यांचे आभार मानले. 2019 विधानसभा निवडणूक आपण महायुतीमध्ये लढवली, हा महायुतीचा विजय असल्याने महायुतीचंच सरकार पुन्हा स्थापन होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

ANI Tweet

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड व्हावी असा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 10 आमदारांनी त्यास अनुमोदन दिले. या वेळी भाजप आमदार डोक्याला भगवे फेटे बांधून विधिमंडळ परिसरात जमले होते. भाजपचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, अभिशेख खन्ना, भाजप महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, भाजप खासदार नारायण राणे आदी मंडळी या वेळी उपस्थित होती.

दरम्यान सत्ता वाटपामध्ये शिवसेनेने 50% सत्तेचा वाटा मागत मुख्यमंत्री पद देखील अडीच वर्ष वाटून घ्यावं असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे भाजपा ही ऑफर स्वीकारणार का? हे पाहणं आता उत्सुकतेचंं ठरणार आहे.