शिवसेना(Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची यंदा ७वी पुण्यतिथी आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले होते. 1966 साली शिवसेनेच्या स्थापनेनंतर 2012 पर्यंत त्यांनी सेनेची भूमिका ठाम पणे मांडली होती. याच काळात लाखो शिवसैनिकांचा पाठिंबा मिळवण्यात आणि तोच आधार टिकवून ठेवण्यात बाळासाहेबांचे कसब दिसून आले. आजही त्यांच्या नावाचा दबदबा राजकीय वर्तुळात कायम आहे. उद्या शिवाजी पार्कात (Shivaji Park)शिवतीर्थावर मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होणार आहे. या गर्दीमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत आणि व्यवस्थपन सुरळीत व्हावे याकरिता शिवसेनेकडून खास तरतुदी करण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सुद्धा वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगच्या जागांसंदर्भात बदल सूचित केले आहेत.
उद्या म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासूनच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवसैनिक गर्दी करतील, तत्पूर्वी त्याठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेत, पर्यायी मार्गात आणि पार्किंग व्यवस्थेत करण्यात आलेले बदल जाणून घेऊयात..
वाहनांची पार्किंग व प्रवेश बंदी
उद्या सकाळी 7 पासून संपूर्ण सेनापती बापट मार्ग, माहीम ते दादर, लखमशी नप्पू रोड आणि फाईव्ह गार्डन परिसर माटुंगा येथे पार्किंगसाठी बंदी असणार आहे तर , सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन वरील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, राजा बढे चौक ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शन, दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दक्षिण जंक्शन येथून गडकरी चौक सेनापती बापट पुतळ्यापासून ते गडकरी जंक्शन पर्यंत, तसेच बाळ गोविंददास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग या मार्गांवरून वाहनं प्रवेश बंदी असणार आहे.
पर्यायी वाहतूक मार्ग
पश्चिम व उत्तर उपनगरातून येणाऱ्या वाहनांना माहीम जंक्शन- मोरी रोड मार्फत- सेनापती बापट मार्ग- बाळ गोविंददास मार्ग असा प्रवास करता येणार आहे. तर पूर्व द्रुतगती मार्गावरून येणाऱ्या वाहनांना शिव जंक्शन येथून- संत रोहिदास मार्गे- वाय जंक्शन- टी जंक्शन- धारावी- माहीम कॉजवे- कलानगर-माहीम जंक्शन- मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्ग असा प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, उद्याच्या दिवसात शिवाजी पार्क मार्गावर कोणत्याच प्रकारच्या पार्किंगला परवानगी नाही. महानगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या शिवसैनिकांच्या सोयीसाठी पाणपोई, शौचालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस देखील उपस्थित असणार आहेत.