मुंबईतील राणीच्या बागेत पेंग्विन नंतर आता पाहायला मिळणार 'हा' प्राणी
Ranichi Baug (Photo Credits: File)

मुंबईतील भायखळा येथे असलेल्या प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत आजपर्यंत पेंग्विन पाहण्यासाठी गर्दी होत होती. पशु प्रेमींसाठी आणि लहान मुलांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे या बागेत आता एका नव्या प्राण्याची एन्ट्री  झाली आहे.  राणीच्या बागेत पट्टेधारी तरसाची जोडी नुकतीच दाखल झाली आहे. कर्नाटक राज्यातील म्हैसूरच्या श्री चमाराजेंद्र प्राणीशास्त्र उद्यानाकडून ही तरसाची जोडी राणीच्या बागेला देणगी म्हणून देण्यात आली आहे.

ही पट्टेधारी तरसाची जोडी 2 जानेवारी 2020 रोजी प्राणिसंग्रहालयात दाखल झाली असून त्यातील नर 3 वर्षांच्या आहे. त्याचे नाव वरुण आहे. तर मादी ही फक्त 2 वर्षांची असून, तिचे नाव सौम्या असे ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, राणीच्या बागेत प्राण्यांसाठी नॅशनल झू ऍथॉरिटीने या संस्थेने सुचवल्याप्रमाणे नव्या पद्धतीचे पिंजरे बांधण्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. आता जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती राणी बाग प्रशासनाने पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पट्टेधारी तरस हे वन्य प्राणी असून ते घनदाट जंगलात राहतात. या प्राण्यांचे प्राणिसंग्रहालयातील आयुष्य जवळपास 25 वर्षांचे असते.

अलिबाग येथे घोडागाडीची समुद्रातून सफर, पशुप्रेमींनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

तसेच मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मुंबईतील पर्यटनस्थळांपैकी प्रसिद्ध असलेल्या राणी बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत देश-विदेशातील वन्यप्राणी प्राणिसंग्रहालयात पुढील काही काळात आणण्यात येणार आहेत. दरम्यान, मंगळुरू प्राणिसंग्रहालयातील बिबट्या, कोल्हा, मोराची जोडी तसेच सूरत प्राणिसंग्रहालयातील अस्वल हे सर्व प्राणी राणी बागेत दाखल झाले आहेत.