Speaker of the Maharashtra Legislative Assembly: नाना पटोले यांच्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून नितीन राऊत, संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा
Nana Patole, Nitin Raut and Sangram Thopte | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Maharashtra Legislative Assembly ) नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे काँग्रेस (Congress) पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली. त्यामुळे सहाजीकच आता रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरु झाली. प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात उर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut) यांच्या नावाची या पदासाठी जोरदार चर्चा असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला संग्राम थोपटे (Sangram Thopte) आणि आणखीही काही नावे चर्चेत आहेत. परंतू, नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडची भेट मिलाल्याने राऊत यांच्या नावाबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्यात महाविकासआघाडी सरकार आहे. त्यामुळे सत्तावाटपाच्या गणितात विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे गेले. त्यामुळे काँग्रेस हायकमांड आता या पदावर कोणत्या चेहऱ्याला पसंती देते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर नाना पटोले यांनी प्रथमच काँग्रेस हायकमांडची भेट घेतली. त्यांनी सोनिय गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे समजते. नान पटोले यांच्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही हायकमांडची भेट घेतली.

नाना पटोले यांच्यानंतर उर्जामंत्री राऊत यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याने चर्चेला बळ मिळाले आहे. परंतू, या निमित्ताने आणखीही काही चर्चा सुरु झाल्या आहेत. जसे की, नाना पटोले यांच्या जागी जर नितीन राऊत यांना अध्यक्ष पद देण्यात आले तर मग उर्जामंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार? असेही समजते की नाना पटोले हे सध्या मंत्रीपद घेणार नाहीत. ते पूर्णवेळ केवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन संघटनात्मक कामावरच भर देतील. (हेही वाचा, Nana Patole on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत भांडण, भाजपला थेट सोडचिठ्ठी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितला किस्सा)

महाविकासआघाडी सरकारमध्ये सत्तावाटपाच्यागणितात काँग्रेसच्या वाट्याला ज्या काही जागा आल्या त्यात विदर्भाला अधिक झुकते माप मिळाले आहे. त्यामुळे या वेळी पश्चिम महाराष्ट्राचा राहिलेला अनुशेष भरुन निघणार का याबाबत याबाबतही उत्सुकता आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदासाठी मंत्री पदाबाहेरचा चेहरा काँग्रेस देणार की एखाद्या मंत्र्याकडे ही जबाबदारी सोपवून नव्या चेहऱ्याची वर्णी मंत्री पदावर लावणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.