Maharashtra Government: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवडाभाराने आज नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास मान्यता दिली आहे. खातेवाटपाची यादी जाहीर झाल्यानंतर लगेचचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, (Housing Minister Jitendra Awhad) कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
ठाकरे मंत्री मंडळात दादा भुसे यांना कृषी खात्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या खात्यासाठी दादा भुसे यांच्या नावाची घोषणा होताच त्यांनी शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत मान-सन्मान मिळून देऊ. तसेच शेती क्षेत्राचा विकास करण्यासाठी जाणकर आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने नवीन योजनांचे नियोजन करू. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सरकार जोमाने काम करणार असून शेतकरी चिंतामुक्त करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असेल, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिली आहे. (हेही वाचा - Maharashtra Cabinet Portfolio Allocation: खातेवाटप जाहीर! अजित पवार अर्थमंत्री, अनिल देशमुख गृहमंत्री तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन खात्याची जबाबदारी; पहा संपूर्ण यादी)
लहानपणीचा घरचा पत्ता -
चाळीचे नाव श्रीपत भवन,
खोली क्रमांक ६,
वाडिया स्ट्रीट,
ताडदेव.
मुंबई..
आणि आज चाळीचा विकास करणार गृहनिर्माण मंत्री पद.
हि किमया फक्त आणि फक्त #शरद_पवार साहेबच करू शकतात. #गृहनिर्माण_मंत्री
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2020
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे आभार मानले असून ही फक्त त्यांची किमया असल्याची भावनिक दिली आहे. यात त्यांनी आपल्या जुन्या चाळीतील घराचा पत्ता दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची साथ कधीचं सोडली नाही. तसेच शरद पवारांनींही जितेंद्र आव्हाड यांना वेळोवेळी राजकीय धडे दिले. त्यामुळे आज जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.