प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

नवरा-बायकोमध्ये नेमक्या कोणत्या कारणांवरून वाद होईल, याचा काही नेम नाही. यातच पुण्यात मटण बनवण्याच्या वादातून नवऱ्याने आपल्या बायकोला मारहाण केली. ज्यात तिचे दात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर बायकोच्या तक्रारीनंतर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील (Pune) औंध (Aundh) परिसरात शुक्रवारी संद्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतीने मटण आणून आपल्या पत्नीला बनवण्यास सांगितले. परंतु, हातात दुसरे काम असल्यामुळे उशीर होईल असे पत्नीने सांगितले. यामुळे दोघांत वाद झाला. या वादाचे भांडणात रुपांतर झाले. त्यावेळी रागाच्या भरात नवऱ्याने तिच्या तोंडावर ठोसा मारुन तिचे दात पाडले.

प्रभाकरन नाडार (वय, 45) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, कविता नाडार (वय, 40) असे संबंधित महिलेचे नाव आहे. हे दोघेही औंध गावातील रहिवासी आहेत. प्रभाकरन हा शुक्रवारी दारू पिऊन घरी मटण घेऊन आला होता. परंतु, हातात दुसरे काम असून मटन बनवायला दीड तास लागेल, असे कविताने सांगितले. त्यानंतर दोघांत वाद सुरु झाला. तसेच एवढा वेळ कशासाठी लागेल? असा प्रश्न त्याने विचारला. यावर कविताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने प्रभाकरन संतापला आणि तिला शिवीगाळ करू लागला. या वादातून दोघांत भांडण झाले. त्यावेळी प्रभाकरनने तिच्या तोंडावर ठोसा मारला. यामुळे कविताचे दात पडून दुखापत झाली आहे. हे देखील वाचा-Buldana: रायपूरमध्ये 16 वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याने मारहाण केल्यानंतर संबंधित महिलेने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आपल्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. बायकोच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुण्यातील औंध परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.