..तर, मंडळी आता दारुही मिळणार घरपोच; राज्य सरकार सकारात्मक
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

...तर, मंडळी आपण दारुचे शौकीन असाल तर, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला दारुसाठी पायपीठ करावी लागणार नाही. आपल्या सोयीसाठी राज्य सरकार एक योजना राबवायचा विचार करते आहे. ज्यामुळे लवकरच आपल्याला दारु घरपोच मिळू शकते. 'ड्रिंक अँड ड्रायव्ह'मुळे होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकार हा विचार करत आहे. उत्पादनशूल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:च हा विचार बोलून दाखवला आहे. अर्थात, ही योजना अद्याप तरी, प्रत्यक्षात आली नाही. पण, केवळ विचाराधीन असलेली ही योजना जर, खरोखरच वास्तवात आणली तर, मद्यपींसाठी अशी सेवा देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे.

मद्य उद्योगासाठी ही योजना 'गेम चेंजर' ठरेल असे मंत्री बावनकुळे यांना वाटते. राज्यभरात होणारे एकूण अपघातांची संख्या पाहिली तर, त्यात रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही आणखी तपशीलात गेल्यास दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे किंवा दारु पिऊन रस्त्यावर चालल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. हे अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित रस्ते प्रवासासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्तू घरपोच करतात. या पार्श्वभूमीवर घरपोच दारु सेवा उपलब्ध करुन दिल्यास ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’सारख्या घटनांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे., असेही बावनकुळे म्हणतात.

दरम्यान, सरकारच्या विचाराधीन असलेल्या योजनेच्या प्रस्तावाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, घरोपच डिलिव्हरीसाठी दारुची ऑर्डर घेताना विक्रेत्याला ग्राहकाची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. यात ग्राहकाच्या आधार नंबर घेणे सक्तीचे असेल. आधार नंबर घेतल्यामुळे ग्राहकाची ओळख पटण्यास मदत होईल. तसेच, ग्राहाला वितरीत करण्यात येणाऱ्या बॉटलवर जियो टॅगिंग असेन. त्यामुळे त्याचे ट्रॅकींग ठेवता येईल. याचाच सरळ अर्थ असा की, उत्पादकापासून ते ग्राहकाच्या घरापर्यंत त्या बॉटलचा प्रवास समजू शकेल. या सेवेमुळे दारुची तस्करी आणि चुकीच्या दारुविक्रीवर पायबंद लावता येऊ शकेल असा विश्वासही बावनकुळे यांनी बोलून दाखवला.