Satish Uke | (File Image)

प्रसिद्ध आणि बहुचर्चीत वकील सतीश उके (Satish Uke) यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने अटक केल्याचे वृत्त आहे. वकील सतीश उके यांच्या नागपूर येथील राहत्या घरी ईडीने गुरुवारी (31 मार्च) सकाळी धाड (ED Raid) टाकली होती. या वेळी ईडीने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर जवळपास दिवसभर चौकशी केल्यानंतर सांयकाळच्या सुमारास ईडीने त्यांना अटक (Advocate Satish Uke Arrested By ED) केली. ईडीने उके यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त होता. दरम्यान, नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती.

एका जमीन घोटाळ्याच्या आरोपात वकील सतीश उके यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, नेमकी जमीन घोटाळ्याशी संबंधितच ही कारवाई आहे की आणखी काही वेगळे प्रकरण आहे याबाबत पुरेशी माहिती पुढे आली नाही. सतीश उके हे नागपूरमधील प्रसिद्ध वकील आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेमुळे सतीश उके सर्वाधिक चर्चेत आले. (हेही वाचा, Advocate Satish Uke यांच्या नागपूर मधील निवासस्थानी ED ची छापेमारी)

दरम्यान, देवेंद्र फडणवीस याच्याविरोधातील याचिकेसोबतच कथीत फोन टॅपींग प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या याचिकेचेही वकीलपत्र उके यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच हे फोन टॅप झाले असा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळे हायप्रोफाईल वकील अशी ओळख असलेल्या उके यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.