
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (UBT) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना मालेगाव कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येईल. जिल्हा बँक फसवणूक प्रकरणात (District Bank Fraud Case) त्यांना भोपाळ येथून बुधवारी (15) अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना रमझानपुरा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आणि आज सकाळी कोर्टासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, या वेळी पोलीस स्टेशन आणि कोर्ट आवारात हिरे समर्थक आणि शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.
शिवसेना (UBT) अद्वय हिरे यांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे
अद्वय हिरे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई राजकीय आकसातून झालेली आहे. आपण सत्तेत आहोत तर आपल्याला कोणाचाही विरोध असला नाही पाहिजे. आम्ही म्हणू तीच सत्ता आणि निर्णय. आम्ही म्हणू तेच दोषी आणि भ्रष्टाचारी असे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे वर्तन आहे. पण एक निश्चित सांगतो आम्ही कोणाला घाबरत नाही. मी आणि माझा संपूर्ण पक्ष अद्वय हिरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. मी फार बोलणार नाही. फक्त इतकेच सांगतो की, आम्ही अनेकांबद्दल तक्रारी केल्या आहेत. अनेकांवर आरोप केले आहेत. काहींवर आगोदरच आरोप आहेत. त्यामुळे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या चौकशा पूर्ण करणार आहोत. आम्हीही त्या वेळी बऱ्याच गोष्टी दाखवून देऊ, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजकीय सुडापोटी कारवाई- संजय राऊत
अद्वय हिरे यांना झालेल्या अटकेचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसात पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील नेत्या सुष्मा अंधारे यांनीही या अटकेवरुन टीका केली होती. आज (16 नोव्हेंबर) शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. जे जे भाजपच्या वळचणीला जातील त्यांच्यावर कारवाई केली जाते. अद्वैत हिरे यांच्यावर असलेले आरोप, गुन्हे हे एका रात्रीत दाखल झाले नाहीत. यापूर्वी अनेकदा त्यांच्यावर या प्रकरणात आरोप झाले आहेत. असे असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. कारण ते भाजपमध्ये होते. आता ते शिवसेना पक्षात आले आहेत. शिवसेना पक्षात आले म्हणून ते भाजप आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खूपत आहेत. त्यामुळे केवळ राजकीय सूडातून अटकेची कारवाई करण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.