Advait Hire Arrested: शिवसेना (UBT) उपनेते अद्वय हिरे यांना अटक; उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का
Advait Hire | (File Image)

Nashik Malegaon News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षास नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना अटक (Advay Hire Arrested) झाल्याचे वृत्त आहे. ते ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) शिवसेना Shiv Sena (UBT) उपनेते आहेत. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या दादा भूसे यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. बनावट दस्तऐवज आणि बँकेची फसवणूक प्रकरणात त्यांना भोपाळ (Bhopal) येथून अटक झाल्याचे वृत्त आहे. त्यांना बुधवारी (दिनांक 15) रात्री उशिरा मालेगाव येथील रमजानपूरा पोलीस चौकीमध्ये चौकशीसाठी आणण्यात आले होते. या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती.

दादा भूसे यांच्या विरोधात घोषणाबाजी

अद्वैत हिरे यांना अटक झाल्यानंतर नाशिक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यांना पोलीस चौकीत आणण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनाला गराडा घातला होता. तसेच, या वेळी मंत्री दादा भूसे यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, हिरे यांना ज्या प्रकरणात अटक ते प्रकरण फसवणू आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याचे आहे. सांगितले जात आहे की, रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी जिल्हा बँकेकडून तब्बल 7 कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. हे कर्ज घेण्यासाठी बनावट दस्तऐवज वापरण्यात आले होते. पुढे या कर्जाची परतफेड न झाल्याने कर्ज वाढत गेले तो आकडा तब्बल 30 कोटींच्या घरात गेला. या प्रकरणी बँकेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप हिरे यांच्यावर आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं भोपाळ (Bhopal) येथून त्यांना ताब्यात घेतले.त्यानंतर त्यांना शिक येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं.

जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा आरोप

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील राजकारण पाठीमगील काही दिवसांपासूनच तापले होते. जिल्हा बँकेची फसवणूक करणाऱ्यांवर सहकार मंत्रालय लवकरच कारवाई करेल, असे वक्तव्य मंत्री दादा भूसे यांनी केले होते. त्यानंतर काहीच काळात हिरे यांच्यावर कारवाई झाली आहे. दुसऱ्या बाजूला हिरे यांना आज स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोर्ट त्यांना जामीन देते की, काही काळ कोठडी सुनावते याबाबत उत्सुकता आहे.

भाजपला सोडचिठ्ठी

अद्वय हिरे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा नाशिक जिल्ह्यातील प्रमुख चेहरा आहे. ते शिवसेना (UBT) उपनेताही आहेत. तसेच, नाशिक येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या विराट सभेचे ते आयोजकही होते. त्यांनी काीह काळ नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते आगोदर भाजपमध्ये होते. मात्र, शिवसेना पक्षात फूट पडल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केला. दादा भूसे यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे.