आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन, मनसेकडून वरळीतल्या पबमधील व्हिडिओ उघडकीस
Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

राज्यासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असा सुद्धा इशारा दिला गेला आहे. अशातच आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मतदारसंघात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही का? असा सवाल उपस्थितीत करत मनसेकडून वरळीतील (Worli) एका पबचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मनसे नेते संतोष धुरी यांनी वरळीतील एका पबचा व्हिडिओ उघडकीस आणला आहे. त्यांच्या व्हिडिओत पबमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आल्याचे दाखवून दिले आहे. याच कारणामुळे आता त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून वरळीत कोरोना नाही का असा सवाल उपस्थितीत केला आहे. शेअर करण्यात आलेला व्हिडिओ हा वरळीतील कमला मिल मधील एका पबचा असून ते रात्री 12 वाजल्यानंतर सुद्धा सुरु असतात असे धुरी यांनी म्हटले आहे. त्यामुळे ऐवढ्या रात्री पब सुरु करण्यासाठी कोण परवानगी देते असा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला आहे.(मुंबई: Covishield लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)

धुरी यांनी युनियन पबमधून फेसबुक लाइव्ह करत ही गोष्ट समोर आणली आहे. त्यावेळी कोरोनाच्या प्रत्येक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचसोबत पब मध्ये आलेल्यांनी मास्कसह सोशल डिस्टंन्सिंग पाळले नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले. अशातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना नियमांचे पालन करावे असे म्हणतात पण वरळीत या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे.