शिवसेना पक्षाकडे सत्तास्थापनेचे केवळ काही क्षण उरले असताना, आदित्य ठाकरे आणि विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
राजभवनात आज शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. पण तसे न झाल्यास, शिवसेना राज्यपालांकडून आणखी काही वेळ मागू शकतील.
भाजपने काल सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं राज्यपालांना सांगितल्यामुळे शिवसेनेला आज संध्याकाळी ६.३० पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करता येणार आहे. परंतु शिवसेनेचं सरकार स्थापनेचं भवितव्य हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या हातात असल्याने अंतिम निर्णय काहीच वेळात येईल.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे तर काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत देखील फोनवर चर्चा केली आहे.