Firing in Front of Judge: सातारा (Satara) जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाई (Wai) मध्ये भर कोर्टात न्यायाधीशांच्या दालनातच एका आरोपीवर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तसेच या प्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सकाळ वृत्तसंस्थेने वृत्त प्रकाशित केलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) याच्यासह निखिल व अभिजीत शिवाजी मोरे (रा गंगापुरी वाई) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या आरोपींवर मोक्काखाली कारवाई करण्यात आली होती. वाई कोर्टात दबा धरुन बसलेल्या एका आरोपीने हा गोळीबार केला. (हेही वाचा - औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात जुंपली (Watch Video))
कुख्यात गुंड बंटी जाधव याने कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात असताना वाईमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. याप्रकरणी वाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे कळंबा कारागृहातून तीन जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र, कोर्टात दबा धरुन बसलेल्या एका आरोपीने बंटी जाधवसह निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे या तिघांवर गोळीबार केला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात लपून बसलेल्या आरोपीने या तीन आरोपींवर दोन गोळ्या झाडल्या. या चकमकीत एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. याशिवाय पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. ही संपुर्ण घटना न्यायाधिशांच्या दालनात घडली. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.