ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अमरजीत यादव याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काल, (शनिवार, 4 सप्टेंबर) रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी फोनवरुन संवाद; आरोपींना कडक शिक्षेचे आश्वासन)
कासारवडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर तो 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत होता. कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी पुन्हा ठाणे न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. यावेळी त्याने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, प्राणघातक हल्ला करणं अशा कलमाअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हांची नोंद करण्यात आली आहे.
माजिवाडा-मानपाडाच्या AMC कल्पिता पिंपळे या अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेल्या असताना त्यांच्यावर अमरजीत यादव नामक फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तर अंगरक्षकाचे 1 बोट तुटून पडले. खरंतर आरोपीने त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिंपळे यांनी त्याचवेळी डोक्यावर हात ठेवल्याने बोटांवर प्रहार झाला आणि बोटं तुटून पडली. सध्या त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याचा शब्द दिला आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पिंपळे यांनी देखील पिंपळे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे.