Accident on Pune-Ahmednagar Road: पुणे-अहमदनगर रोडवर अपघात; कार आणि दुचाकीला ट्रकची धडक, 5 ठार तर 4 जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Accident on Pune-Ahmednagar Road: महाराष्ट्रातील पुणे-अहमदनगर रस्त्यावर ट्रकने कार आणि दोन मोटारसायकलला धडक दिल्याने पाच जण ठार झाले. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील दोन आणि दोन मोटरसायकलवरील तीन जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती शिकारपूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्वप्नील पंडित केंदळ (वय 24, रा. कांदिवली, मुंबई), पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील रहिवासी लीना राजू निकसे, 24 वर्षीय तेजस राजू निकसे आणि पारनेर अहमदनगरचे रहिवासी विठ्ठल पोपट हिंगडे (वय 38), रेश्मा विठ्ठल हिंगडे (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. (वाचा - 'संधी मिळाली तर Nana Patole यांना चपलेने मारू'; BJP चे पुणे अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे वादग्रस्त वक्तव्य)

अपघातानंतर ट्रक चालक फरार -

एपीआय रणजित पठारे यांनी सांगितले की, "रविवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर जाऊन धडकले. या घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला."

आयपीसी आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संजय केंडल, आशा राजू निकसे, राजू सीताराम निकसे आणि रोहन उत्तम बर्वेकर अशी जखमींची नावे आहेत. एर्टिगा कारमधील निकसे कुटुंबातील सहा जणांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. त्याच्याविरुद्ध शिकारापूर पोलिस ठाण्यात आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.