Stray Dogs | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भटके कुत्रे (Stray Dogs) नागरिकांसाठी धोकायादयक ठरत आहेत. विविध शहरं आणि गावांमध्ये मोकाट असलेले हे श्वान (Dogs) नागरिकांवर हल्ले तर करतातच पण परिसरही अस्वच्छ करतात. धक्कादायक म्हणजे या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये (Stray Dog ​​Attack) आणि अनेकदा अपघातास कारण ठरल्याने अनेकांचे प्राण गेले आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात असेच कुत्रे रस्ता अपघाताचे (Accidents Due to Stray Dogs) कारण ठरले. ज्यामुळे सम्राट काकासाहेब कदम (वय 40, रा. सुभाषनगर, मिरज) नामक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे पोलीस दलात (Pune Police Force) कार्यकरत असलेले सम्राट कदम हे आपल्या मेव्हण्याच्या घरी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात दुचाकी चालक प्रकाश तातोबा संकपाळ हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिरज शहरातील सिद्धीविनायक रुग्णालय परिसरातील घटना

पुणे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राट कदम हे पुणे येथील बालाजीनगर पोलिस ठाण्यात (Balaji Nagar Police Station) कार्यरत होते. ते आपला मेहुणा प्रकाश संकपाळ यांच्यासोबत MH 10 BF 4577 क्रमांकाच्या दुचाकीवरुन सोमवारी रात्री सांगलीकडे निघाले होते. रात्री नऊच्या सुमारास ते मिरज येथील सिद्धीविनायक रुग्णालयासमोर आले. त्याच वेळी एका विशिष्ठ वेगात पुढे निघालेल्या दुचाकीसमोर अचानक भटके कुत्रे आले. ज्यामुळे दुचाकी चालक प्रकाश संकपाळ यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्तादुभाजकावर जाऊन आदळली. ज्यामुळे सम्राट हे दुभाजक ओलांडून पलिकडील रस्त्यावर पडले. त्यातच विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला आणि ते जखमी झाले. दुचाकी चालक प्रकाश संकपाळही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सम्राट यांच्यावर उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. (हेही वाचा, Dog Bites in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये कुत्र्यांची दहशत; एका दिवसात तब्बल 135 जणांवर हल्ला, प्रशासन गप्प असल्याचा नागरिकांचा आरोप)

एक ठार, एकाची प्रकृती गंभीर

पाठिागील 20 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत असलेल्या सम्राट कदम यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, जखमी प्रकाश संकपाळ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा, IAS Officers Appoints For Stray Dog Managing: भटक्या कुत्र्यांचा सामना करण्यासाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती; मध्य प्रदेश सरकारचा निर्णय)

नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

भटक्या कुत्र्यांमुळे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी तर लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या शरीराचे लचके तोडले गेले. अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.