भरघाव कंटेनरने एका कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात (Road Accident) घडला आहे. ही घटना अहमदनगर-मनमाड महामार्गावरील (Ahmednagar-Manmad Highway) विळद घाटात (Vilad Ghat) आज दुपारी घडली आहे. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, 9 वर्षाच्या चिमुकल्याचा थोडक्यात जीव बचावला आहे. याप्रकरणी एमआयडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रवींद्र किसन पाटील (वय, 45) आणि त्यांची पत्नी मनीषा रवींद्र पाटील (वय, 42) या दोघांचा मृत्यू झाला आहे. रवींद्र आणि मनिषा त्यांच्या 9 वर्षाच्या मुलगा ऋषीकेश याच्यासह पाचोरा येथून आज दुपारी अहमदनगर-मनमाड महामार्गावरून पुण्याकडे जात होते. मात्र, त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटनेरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली आहे. त्यानंतर कंटेनर उलटून कारवर पडला. यात रवींद्र आणि मनिषा या दोघांचा जागी मृत्यू झाला आहे. सुदैवाने, ऋषीकेश थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची माहिती पाटील कुटुंबियांना देण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Nagpur: 25 वर्षीय युवकाने बनवला बॉम्ब; निकामी करण्यासाठी गाठले पोलिस स्टेशन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र आणि मनीषा यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच ऋषीकेश याच्यावर विखे पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अहमदनगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या संदर्भात सामनाने वृत्त दिले आहे.