Abhijit Bichukle And Ajaz Khan (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2019)  यंदा मातब्बर राजकीय मंडळींसह काही सेलिब्रिटी उमेदवारांनी देखील आपले नशीब आजमावले होते. यामध्ये वरळी (Worli) मतदारसंघातून अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle), कळवा मुंब्रा (Kalwa-Mumbra)येथून दीपाली सय्यद (Deepali Sayyad) तर भायखळा (Byculla) मतदारसंघातील जागेसाठी एजाज खान (Ajaz Khan)  हे सेलिब्रिटी उमेदवार चांगलेच चर्चेत आले. मात्र आज पार पडलेल्या मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालात या मंडळींना जनतेने अपेक्षित पाठिंबा न दिल्याचे समोर येत आहे. बिचुकले आणि एजाज खान यांना तर आमदारकीची अपेक्षा असताना जनतेने NOTA पेक्षाही कमी समर्थन दिले आहे. परिणामी ही सेलिब्रिटी मंडळी तोंडघशी पडली आहेत.

वरळी मतदारसंघातून अभिजित बिचुकले यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध उमेदवारी दाखल केली होती. याआधी सुद्धा बिचुकले यांनी 20 हुन अधिक वेळेस आमदारकी, खासदार पदापासून झाडून सर्व निवडणुका लढवल्या आहेत. याशिवाय बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात त्यांना पुन्हा एकदा बरीच प्रसिद्धी मिळाली होती, त्यामुळे या साऱ्याचा फायदा होऊन बिचुकले यांना आपल्या विजयाची शक्यता वाटत होती. पण वरळीकरांनी बिचुकले यांना 776 मते दिली.विशेष म्हणजे या भागात नोटा म्हणजेच वरीलपैकी कोणताही उमेदवार नाही या पर्यायाला 6305 लोकांनी निवडले आहे.

असाच समान प्रकार भायखळा मध्ये एजाज खान याला सुद्धा बिग बॉस हिंदी मुळे बरीच प्रसिद्धी मिळाली होती, मात्र आज मतांमध्ये एजाजला 2173 मते आणि नोटा ला 2791 मते मिळाली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल: एकमेव आमदार प्रमोद पाटील निवडून आल्यानंतर मनसेचे पहिले ट्विट, पाहा काय म्हणाले?

दुसरीकडे, कळवा- मुंब्रा मतदार संघातून देखील शिवसेनेने दीपाली सय्यद यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध रिंगणात उतरवले होते. दीपाली सय्यद यांना सुदैवाने नोटा पेक्षा जास्त मते मिळाली होती मात्र तरीही आव्हाडांच्या मतदारसंघातून त्यांना विजय मिळवणे शक्य झाले नाही.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे महत्पूर्ण निकाल समोर आले आहेत. एकंदरीतच शिवसेनेला 57 आणि भाजपाला 103 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर महाआघाडीने सुद्धा यंदा लक्षवेधी विजय मिळवला आहे. या निकालावरून तरी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता टिकून राहणार असल्याचे स्पष्ट आहे तर महाआघाडी विरोधी पक्ष म्हणून समोर येऊ शकतो.