आपली वादग्रस्त विधाने, वर्तन आणि भूमिका यांमुळे नेहमी चर्चेत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आता पुरते गोत्यात आले आहेत. सत्तार यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली असून त्यांचे नाव आता थेट त्यांच्या कथीत पीएने केलेल्या लाचखोरी प्रकरणात आले आहे. अकोला येथे कृषी विभागाच्या कथीत पथकाने एक धाड टाकली होती. जी अत्यंत वादग्रस्त ठरली. या धाडीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दीपक गवळी (Deepak Gawli Case) हा आपला स्वीय सहायक नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी 10 जून रोजीच अकोला येथे सांगितले होते. मात्र, तत्पूर्वी 20 दिवसांआधी अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय दौरा केला होता. या दौऱ्यात याच दीपक गवळी याचा उल्लेख 'स्वीय सहायक' असा करण्यात आला होता. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या धडधडीत खोटे बोलण्याचा पुरावाच पुढे आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होऊ घातला आहे. मात्र, विद्यमान सरकारमधील काही मंत्र्यांना नारळ द्यावा मगच मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी भाजपची भूमिका असल्याचे वृत्त आहे. उल्लेखनीय म्हणजे ज्या मंत्र्यांना डच्चू द्यावा अशी मागणी होते आहे त्यात अब्दुल सत्तार यांच्या नावाचाही समावेश असल्याचे समजते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांची विकेट पडणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
अलोका शहरातील एमआयडीसी परिसरात कृषी विभागाच्या एका पथकाने कथीतरित्या धाड टाकली होती. या धाडीमध्ये कारवाई करत असलेल्या पधकामध्ये एका अनधिकृत व्यक्तीचा समावेश असल्याची चर्चा होती. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडे मोठ्या रकमेची लाचही मागितल्याचा धक्कादायक आरोप झाला होता. या पथकात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहायक असलेल्या दीपक गवळी आणि वादग्रस्त व्यक्तीमत्व हितेश भट्टड यांचा समावेश असल्याचा आरोप होता. त्यावरुन मोठे आरोप प्रत्यारोप झाले होते.
शिवसेना (UBT) गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर तीव्र आरोप केले होते. दरम्यान, दीपक गवळी हा आपला स्वीय सहायक नसल्याचे सत्तार यांनी म्हटले होते. मात्र, छत्रपती संभाजीनगरचा दौरा पाहिला तर त्यात गवळी याचा उल्लेख स्वीय सहायक असाच आहे. त्यामुळे सत्तार यांच्या भूमिका आणि वक्तव्यावरुन उलटसुलट चर्चा सुरु आहे.