राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याभर असंतोष पाहायला मिळत आहे. या असंतोषातूनच अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तो घ्यावा, अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षात असलेले सर्वच राजकीय पक्ष विशेष आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतो आहे. या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरआव्हान निर्माण झाले आहे.
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर आम्ही आमची भूमिका राज्यपालांकडे मांडली आहे. भारतीय जनता पक्षानेही या विधानाची गंभीर दखल घ्यावी. सरकारं येतात जातात. परंतू, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावे की, सत्तेसाठी कोणाकोणाला पदरात घ्यावे आणि कोणाकोणाची तळी उचलावी. राज्याच्या राजकारणात असे बोलण्याची पद्धत नाही. ही नवीच पद्धत या लोकांनी शोधली आहे का, हेही सत्ताधाऱ्यांनी सांगावे असेही जयंत पाटील म्हणाले. (हेही वाचा, Watch: सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत Abdul Sattar यांनी व्यक्त केला खेद, दिले 'हे' स्पष्टीकरण)
अब्दुल सत्तार यांच्या विधानावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि मुंबईच्या माजी खासदार किशोरी पेडणेकर यांनीही सत्तार यांच्या विधानावरुन तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दोन थोबाडीत मारुन मग माफी मागायची असाल प्रकार योग्य नाही, असे म्हणत त्यांनी सत्तार यांच्या विधानावरुन आक्षेप घेतला आहे.
दुसऱ्या बाजूला, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून हकलून द्यायला हवे. त्यांनी ज्यापद्धतीने एका महिलेबद्दल उद्गार काढले आहेत ते पाहता त्यांना मंत्रिमंडळात ठेवताच कामा नये. सत्तार यांच्या विधानावरुन आक्रमक झालेल्या विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, अब्दुल सत्तार यांनी असे विधान करण्याची ही पहिलीच वेळनाही. ते सातत्यानेच निजाम प्रवृत्तीने वर्तन आणि विधान करत असतात. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी करण्यात यावी.