महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ( Maharashtra Gram Panchayat Election Results) आज लागले आहेत. राज्यात पार पडलेल्या या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा 80 टक्के विजय झाला आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. याचपार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सत्ता असणाऱ्या आम आदमी पक्षाने मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात चमत्कार करून दाखवला आहे. आम आदमी पक्षाने लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आपला झेंडा फडकवला आहे. या विजयानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी मराठीतून ट्विट करत आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात दापक्याळ ग्रामंपचायतीत आम आदमी पक्षाने 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयासह आपने दापक्याळ ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन केली आहे. या विजयानंतर आपचे महाराष्ट्र युवा शाखेचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी अरविंद केजरीवाल यांनी टॅग करत ट्विट केले होते. या ट्विटला अरविंद केजरवाल यांनी मराठीतून रिप्लाय देत कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे देखील वाचा-Maharashtra Gram Panchayat Election Result 2021: भाजपचे 6000 सरपंच होतील, चंद्रकांत पाटील यांचा दावा
अरविंद केजरीवाल यांचे ट्विट-
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. https://t.co/F89YnNX6ZQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 18, 2021
लातूरमधील ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावून आपने महाराष्ट्रामध्ये खाते उघडले आहे. महाराष्ट्रात येत्या काही काळात आप हा मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला जात आहे.