
आळंदी (Alandi) मध्ये एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 15 वर्षीय मुलाकडे संगीत शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याने घडला प्रकार संस्था चालकाला सांगितला पण त्यांनी कारवाई केली नाही. अखेर तो मुलगा पोलिसांत गेला आणि दिघा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सध्या या प्रकरणामध्ये शिक्षकासह संस्था चालकावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं वृत्त ABP Majha ने दिले आहे.
आळंदी आणि आजुबाजूच्या भागात वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खाजगी शिक्षण संस्था बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हा जानेवारी 2025 पासून तिसरा तर आतापर्यंतचा 7वा गुन्हा असल्याचं समोर आलं आहे.
जानेवारी महिन्यात आळंदी मध्ये एका वारकरी शिक्षण संस्थेत 12 वर्षांच्या दोन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराची घटना समोर आली होती. . एका संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या 28 वर्षांच्या तरुणानं 12 वर्षांच्या दोन मुलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अनधिकृत खासगी वारकरी संस्था बंद करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी 20 पथकं नेमून आळंदीत सर्वेक्षणही केले होते. मात्र आता पुन्हा तशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.