
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि त्यांचा चुलत भाऊ (युवासेना पदाधिकारी) वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) चे वार्षिक सदस्यत्व शुल्क चुकवले आहे. आता एमसीएने मुंबई क्रिकेट असोसिएशन (वानखेडे स्टेडियम) चे सीईओ, यांना पत्र लिहून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची परवानगी मागितली आहे. सरदेसाई यांनी गेल्या 10 वर्षांपासून सदस्यत्व नूतनीकरण शुल्क भरलेले नाही.
एमसीएच्या खात्याच्या तपशीलानुसार सरदेसाई यांची 2013 पासून आजपर्यंत (2022-23) एकूण थकबाकी सुमारे 38,515 रुपये आहे. अहवालानुसार, सर्व 92 थकबाकीदार सदस्यांची एकूण थकबाकी 22,72,129 रुपये आहे. याआधी एमसीएला अनेक स्मरणपत्रे पाठवण्यात आली आहेत. आता व्यवस्थापनाने 3 ऑगस्ट रोजी सी एस नाईक, सीईओ- मुंबई क्रिकेट असोसिएशन (वानखेडे स्टेडियम) यांना पत्र लिहून या 92 थकबाकीदार लोकांचे सदस्यत्व रद्द करण्याची परवानगी मागितली आहेत.
डिफॉल्टर्सची यादी आणि सदस्यत्व रद्द करण्याची परवानगी मागणारे पत्र याबद्दल माहिती असलेल्या एमसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मिड-डेला सांगितले, ‘सदस्यत्व रद्द करण्याऐवजी, आम्ही सदस्यांना आणखी एक (अंतिम स्मरणपत्र) नोटीस पाठवण्यास सांगितले आहे. तरीही त्यांनी त्यांची थकबाकी भरली नाही, तर अधिकारी अशा प्रकरणांमध्ये कारवाई (सदस्यत्व रद्द करणे) करू शकतात.’ (हेही वाचा: COVID-19 : कोविडकाळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्रिमंडळाचा दिलासा)
डिफॉल्ट नोटीसला उत्तर देताना, युवासेना प्रमुख ठाकरे म्हणाले, ‘मला या दोन विशिष्ट वर्षांच्या थकबाकीबद्दल माहिती नव्हती. माझा विश्वास आहे की, उर्वरित वर्षांचे नियमितपणे पैसे दिले गेले आहेत. कार्यालय आणि एमसीएशी संपर्क साधून तपासणी करेल आणि थकबाकी भरेल.’
दरम्यान, मालाड येथील मढ, मार्वे येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या स्टुडिओवरून काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरण तापले होते. या ठिकाणी असलेल्या 49 स्टुडिओबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचे नावहीस समोर आले होते. या परिसरात माजी मंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांनी भेटी का दिल्या हे शोधून काढण्याची मागणी भाजपने केली होती.