Aaditya Thackeray | Twitter

दावोस (Davos) ला जाणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या राज्याच्या शिष्टमंडळामध्ये 50 जणांचा समावेश असून त्यामध्ये काही दलाल, पीए,ओएसडी आणि काहींच्या पत्नी व मुलांचा समावेश असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये सार्‍या 50 जणांची माहिती आणि मंजुरी परराष्ट्र मंत्रालयाकडून घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. करदात्यांच्या पैशांची यामधून पुन्हा उधळपट्टी होणार असल्याचं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

रोहित पवारांपाठोपाठ आता आदित्य ठाकरेंकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्याच्या अधिकृत शिष्टमंडळात सहभागी होत असलेल्या व्यक्तींमध्ये अनेकांचा सरकारशी किंवा तिथे होणाऱ्या MOU शी काहीही संबंध नसल्याचा आणि या व्यक्ती इतर संस्थांच्या नावाखाली, कुटुंबातील व्यक्ती आणि इतर व्यक्ती असल्याचा आरोप आहे. Davos World Economic Forum 2024: स्वित्झर्लंडच्या दावोस येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद; महाराष्ट्रातून CM Eknath Shinde यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ होणार सहभागी.

पहा आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद

मुख्यमंत्री आणि इतर अधिकारी मिळून 15-20 व्यक्तीच या दौऱ्यावर जाणे अपेक्षित आहे. यामध्ये साथीदाराला सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे. पण काहींची मुलंबाळं देखील आहेत. म्हणजे हा दौरा सहल आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे शिष्टमंडळ राष्ट्रीय शिष्टमंडळापेक्षाही मोठं आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रवासाची मंजुरी यापैकी किती जणांकडे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

परदेशी सहलीला जाणाऱ्या या व्यक्ती वैयक्तिक खर्चातून जात असल्याचा बचावही केला जाऊ शकतो, परंतु त्यांचा हॉटेल, वाहनांचा खर्च करदात्यांच्या पैशांतून होणार आहे. असा दावा ठाकरेंनी केला आहे.