Aaditya Thackeray Nashik Daura: दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी लोटांगण; आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका
Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

Shiv Sena (UBT) News: दिल्लीसमोर लोटांगण घालणाऱ्यांना देशातील आणि राज्यातील जनता धडा शिकवेल. केवळ दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत. त्यांना राज्याच्या विकासाचे काहीही पडलेले नाही. जाती-धर्मांमध्ये वाद, शेतकरी आंदोलन सुरु असताना केवळ दडपशाहीचे धोरण सुरु आहे, अशी टीका शिवसेना (UBT) पक्षाचे युवा नेते, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray Nashik Daura) यांनी केली आहे. ते जेल रोड येथील शिवसेनेच्या युवासेना मेळाव्यात बोलत होते. नाशिक रोड येथील संत ज्ञानेश्वरनगर येथील बुधवारच्या (14 फेब्रवारी 2023) सभेस मोठ्या शिवसैनिक, युवासैनिक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

'शेतकऱ्यांच्या मार्गात सरकारचे खिळे'

आदित्य ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. देशामध्ये अनेक ठिकाणी जाती-धर्मांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो आहे. पूर्व ते पश्चिम राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष, काही राज्यांमध्ये हिंसाचार सुरु आहे. लद्दाखमधील जनता आपले राज्य परत मिळविण्यासाठी लढते आहे. तर दुसऱ्या बाजूला देशभरातील शेतकरी आंदोलन  करत आहे. विविध मागण्यांसाठी तो दिल्लीकडे जात आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकून दिल्लीच्या सीमा बंद केल्या जात आहेत. अशा दडपशाही करणाऱ्या सरकारविरोधात जनतेच्या मनात तीव्र भावना आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Aaditya Thackeray On ED, I-T and CBI: ईडी, आयटी आणि सीबीआय एनडीएचा भाग; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका)

' जवळपास आर्धी भाजप काँग्रेसवाल्यांची'

राज्यातील विविध उद्योग गुजरातला पळविण्याचे उद्योग सुरु आहेत. विद्यमान राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली केवळ मुंबईला ओरबडण्याचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राजकीय पक्ष फोडाफोटीचे काम सुरु आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय सुरु आहे. इतकं सगळं करुनही भाजपचे पोट भरत नाही. त्यांना आणखी पक्ष फोडायचेच आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जवळपास आर्धी भाजप काँग्रेसवाल्यांचीच झाली आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचे स्वतंत्र दौरे महाराष्ट्रभर सुरु आहेत. पक्ष बांधणीसाठी दोघेही जोरदार प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा, CM Eknath Shinde On Aaditya Thackeray: सत्ता गेल्याने माशासारखे तडफडतात; एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका)

आदित्य ठाकरे यांच्या सभेला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, सागर भोजने, देवानंद बिरारी, माजी नगरसेविका मंगला आढाव, प्रशांत दिवे, राहुल ताजनपुरे, शिवा गाडे, राहुल बोराडे, सुनील बोराडे, मसूद जिलानी यांच्यासह युवासेना तसेच शिवसेना (UBT) पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांचे सभेपूर्वी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी मोठ्या आवाजातील घोषणांनी परिसर दणानून सोडला.