प्रसूतीनंतर एका महिलेची प्रकृती अचानक बिघडून तिचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांकडून रुग्णालयात तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोलापूरच्या (Solapur) माळशिरस (Malshiras) जवळील वेळापूर (Velapur) येथे घडली आहे. या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच संबंधित महिलेचा मृत झाला आहे, असा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. यात रुग्णालयाचे जवळपास सहा लाखांचे नुकसान झाल्याचे डॉक्टरांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पायल अनिल मगर (वय, 19) असे मृत महिलेचे नाव आहे. पायल यांना प्रसूतीसाठी वेळापूरच्या नाईक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रसुतीनंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे त्यांना अकलूज येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. दुर्देवाने, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. नाईक दाम्पत्यच पायल यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत, या आरोपाखाली त्यांच्याविरोधात वेळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी पोलीस चौकशी सुरु असताना पायल यांच्या नातेवाईकांनी चक्क नाईक रुग्णालयाची तोडफोड केली आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वेळापूर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Maharashtra: पंढरपूर येथे पोलीओ लसीकरणावेळी बळांच्या जीवाशी खेळ, डोस देताना पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा
पायल यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या काचा, दरवाजे, खुर्च्या, टेबल, उपकरणे, फर्निचर असे जवळपास सहा लाखांचे नुकसान केले आहे. एवढेच नव्हेतर त्यांनी डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांनाही मारहाण केली आहे. तसेच डॉक्टरांच्या राहत्या घरामध्ये घुसून नातेवाईकांनी रोख रकमेसह काही मौल्यवान ऐवज चोरला असल्याचे डॉक्टरांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अशोक रामचंद्र थोरात, रोहित अशोक थोरात, राहुल विजय थोरात, प्रशांत कृष्ण सावंत याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथील रहिवासी आहेत. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.