चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केल्याची (Murder) धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी (Kurar Police) आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या एका तरूणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडण झाले. याच वादातून आरोपीने पत्नीच्या गळ्यावर, छातीवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली आहे.
न्युज 18 लोकमतच्या वृत्तानुसार, मृत महिला ही मालाड पूर्व परिसरातील क्रांतीनगर भागांमध्ये राहायला होती. तिचे काही वर्षांपूर्वी महेश सोनी नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. परंतु, संबंधित महिला गेल्या काही दिवसांपासून रात्री उशीरा येत होती, याचा महेशला राग होता. याबाबत त्याने अनेकवेळा आपल्या पत्नीला जाब विचारला. दरम्यान, या महिलेचे शेजारी राहणाऱ्या एका तरूणाशी संबंध असल्याची माहिती महेशला मिळाली. यावरून यावरून महेशने आपल्या पत्नीला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही महेशच्या पत्नीचे रात्री उशिरा घरी येणे सुरूच होते. याच मुद्द्यावरून महेश आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, महेशने आपल्या पत्नीच्या गळ्यावर छातीवर आणि पोटावर 10 वार करून निर्दयपणे हत्या केली. हे देखील वाचा- Beed: खळबळजनक! भावकीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, बीड येथील धक्कादायक घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची हत्या झाल्याची माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी दिली. त्यानंतर पोलिसानी घटनास्थळी धाव घेत चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णात पाठवला आहे. दरम्यान, या हत्येनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार सांगितले जात आहे.