एकीकडे राज्यात अजूनही अनेक ठिकाणी वीज (Electricity) कपात चालू आहे, शासन 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पाळीव कुत्र्यासाठी (Pet Dogs) वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई (New Mumbai) येथील नेरूळ (Nerul) परिसरातील, एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्यांवर असलेल्या प्रेमामुळे विजेची चोरी केली आहे. या व्यक्तीला आपल्या पाळीव कुत्र्यांना दिवसभर वातानुकूलित आरामात ठेवायचे होते, त्यासाठी त्याला घरात एसी (A/C) लावायचे होते, म्हणून त्याने 6.98 लाख रुपये विजेची चोरी केली.
तर्पण अमीन असे या व्यक्तीचे नाव असून, तो नेरूळ, सेक्टर 1 मधील ट्विनलँड टॉवरचा रहिवासी आहे. महावितरणच्या वीजपुरवठा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने एकूण 34,465 युनिट्स वीज चोरी केली, ज्याची एकूण किंमत 6.98 लाख रुपये आहे. यासाठी त्याला 24 हजार दंडही आकारण्यात आला व अशाप्रकारे तर्पणने केलेल्या वीज चोरीबद्दल 7 लाख 22 हजार रुपये भरले आहेत.
अमीनकडे तीन पाळीव कुत्रे आहेत. अमीनच्या म्हणण्यानुसार, यातील एक गोल्डन रिट्रीव्हर आहे, जो एसीशिवाय राहू शकत नाही. त्याने ही 'वीज चोरी' नक्की कशी केली याचा तपशील स्पष्ट नसला, तरी, अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमीनने छुप्या पद्धतीने इमारतीच्या विजेच्या केबिनमधून थेट कनेक्शन घेतले होते, त्यासाठी त्याला कोणतेही बिल आकारले जात नव्हते. (हेही वाचा: वीज चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम, देशभरात लावणार 30 कोटी प्रीपेड स्मार्टमीटर)
एका सतर्क नागरिकाने वीज महामंडळाकडे याबाबत तक्रार केली होती. याबाबत अधीक्षक अभियंता राजाराम माने व कार्यकारी अभियंता सिंहजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वात, अधिकाऱ्यांच्या टीमने जिथे ही वीज बेकायदेशीररीत्या वापरली होती त्या इमारतीवर छापा टाकला. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अमीनने दंडासहित संपूर्ण शुल्क भरल्यामुळे त्याच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल केले गेला नाही.