डोंबिवलीतील लिंग कापलेल्या त्या तरुणाचा अखेर मृत्यू
(Photo courtesy: ANI)

सतत छेड काढतो म्हणून एका महिलेने आपल्या 2 साथीदारांसह एका व्यक्तीचे लींग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या व्यक्तीला उपचारासाठी मुंबईयेथील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्य झाला आहे. ही धक्कादायक घटना 26 डिसेंबरला घडली होती. चिंताजनक प्रकृती असलेल्या या तरुणाचा तीन दिवसानंतर मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ही महिला आणि तिच्या दोन्ही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डोंबिवलीतील नांदिवली परिसरातील या महिलेची हा तरुण सतत छेड काढत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, ही गोष्ट मी तुझ्या पतीलाही सांगेन, अशी धमकीही तो द्यायचा. या त्रासाला ही महिला कंटाळली होती. त्यामुळे चिडून तिने या तरुणाला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानुसार तिने या तरुणाला एका निर्जन स्थळी बोलावले. तिथे आधीच तिचे साथीदार हजर होते. हा तरुण तिथे आल्याबरोबर त्यांनी याला पकडले आणि मारहाण करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांनी त्याचे लींग कापले.

स्थानिक लोकांनी या घटनेची मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाची अवस्था पाहून त्यांनी लगेच त्या तरुणाला जखमी अवस्थेत डोंबिवलीच्या एका रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्याला जेजे रुग्णालयाल हलवण्यात आले. आता या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात या महिलेसह प्रतिक केनिया आणि तेजस म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे.