Coronavirus Cases In Mumbai: मुंबईकरांना दिलासा! कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट; गेल्या 24 तासात 804 नवे कोरोनाग्रस्त
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

Coronavirus Cases In Mumbai: मुंबईकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, आज शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट आली आहे. गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 804 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तसेच 37 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दिवसभरात 1293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88 टक्के झाला आहे. सध्या मुंबईमध्ये एकूण 19,035 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2,21,458 रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे.

याशिवाय आज महाराष्ट्रात आज 3,645 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 84 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 9,905 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 14,70,660 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.2 % एवढे झाले आहे. (हेही वाचा - नागरिकांना मोठा दिलासा! राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट; प्रती तपासणीमागे 200 रुपये कमी)

दरम्यान, आज राज्यात 84 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 86,45,195 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,48,665 (19.07 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25,30,900 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 13,690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्य सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट करण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर प्रती तपासणी सुमारे 200 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. या नव्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.