प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातर्गत येत असलेल्या नलेश्वर (Naleshwar) शेतशिवार नहर परिसरात एका वाघाने हल्ला (Tiger Attack) करून शेतकऱ्याला ठार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास समोर आली आहे. मृत शेतकरी दुबार पेरणी पिकाला पाणी देण्यासाठी सायंकाळच्या समारास शेतात गेले होते. मात्र, उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. दरम्यान, मृत व्यक्तीचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत नलेश्वर परिसरात आढळून आला. यामुळे आजूबाजुच्या परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर परिसरातील ही दुसरी घटना असल्यामुळे वाघांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

माणिक जगण नन्नावरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नन्नावरे हे दुबार धान रोवणी केलेल्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. घरी परताना ते एका पाणवठ्याजवळ शौचास गेले असता अचानक एका पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नन्नावरे हे जागीच ठार झाले. दरम्यान, वाघाने नन्नावरे यांना घटनास्थळापासून नलेश्वर विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या वन टेकडी येथील कालव्याजवळ नेले. घटनेची माहिती मिळाताच वनपरिक्षेत्र अधिकारी हे घटनास्थळी जाऊन त्यांनी नन्नावरे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, नन्नावरे यांच्या परिवाराला अर्थिक मदत म्हणून विनविभागाकडून 25 हजार रोख आणि 4 लाख 75 हजारांचा धनादेश देण्यात आला आहे. सध्या या परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले असून लोक शेतात जायला घाबरत आहे.हे देखील वाचा- नवी मुंबई: तरुणाची पॅन्ट उतरवून गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न; दिघा येथे धुलीवंदनाच्या दिवशी घटना

गेल्या काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात एका महिलेवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली होती. यात महिलेचा जागेवर मृत्यू झाल्याचे माहिती समोर आली होती. संबंधित महिला ही औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी शेतात गेली होती. त्यावेळी वाघाने तिच्यावर झडप घातली होती. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते.