Mumbai: दादरहून घरी परतणाऱ्या 32 वर्षीय तरुणाला चेंबूरमध्ये भरधाव ट्रेलरने चिरडले; चालकाला अटक
Accident (PC - File Image)

Mumbai: दादरहून घरी परतणाऱ्या नवी-मुंबई (New Mumbai) येथील 32 वर्षीय तरुणाचा बुधवारी रात्री चेंबूर (Chembur) मधील सुमन नगरजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने ( Trailer) चिरडून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा निवृत्त पोलिसाचा मुलगा होता. तो त्याच्या स्कूटरवरून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) जवळ येत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्याला चिरडले.

सुरज पाटील असे मृताचे नाव असून तो दादर येथील प्रसिद्ध क्रांती सिन्हा नाना पाटील भाजी मंडईत भाजी विक्रेता आहे. मोठा भाऊ मनोज याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, सूरज दादरवरून सायंकाळी 6 वाजता निघायचा. (हेही वाचा - Thane: 50 हजारांची लाच मागणाऱ्या 52 वर्षीय महिला नायब तहसीलदाराला अटक)

घटनेच्या दिवशी सुरज घरी निघाला होता. रात्री दहाच्या सुमारास चेंबूर येथील सुमन नगरसमोरील अण्णाभाऊ साठे पुलावर मागून एक ट्रेलर आला आणि त्याने सूरजला धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक एवढी जोरदार होती की, यात स्कूटर रस्त्याच्या एका टोकाला धडकली, तर सूरजला ट्रेलरने चिरडले. या अपघातात सूरजचे पोट आणि पाय चिरडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

निष्काळजीपणे ट्रेलर चालवणाऱ्या ट्रेलर चालकाला काही स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी सूरजला राजावाडी रुग्णालयात नेले, मात्र पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, असगर खान (36) असे चालकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग), 304ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार त्याला अटक करण्यात आली आहे.