Visarjan | Wikipedia

Ganpati Visarjan 2023: नाशिक जिल्ह्यातील निफाड (Niphad) तालुक्यातील पाचोरे वाणी गावात बुधवारी दुपारी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन (Ganpati Immersion) सुरू असताना एक 20 वर्षीय व्यक्ती नदीत वाहून गेला. राज उमेश वाघ असं या तरुणाचं नाव आहे. राज पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊ शकला नाहीत आणि तो पाण्यात घसरला. परिसरात मुसळधार पावसामुळे नदीला प्रवाह जोरदार वाहत होता. त्यामुळे पोलिस आणि अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेची गतीही मंदावली. राजचा अद्याप शोध लागलेला नाही.

दरम्यान, आज ढोल-ताशे आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात मुंबईतील विविध गणेश मंडळांनी दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता होत आहे. सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणूका काढल्या जात आहेत. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी गर्दी जमली आहे. (हेही वाचा - Lalbaugcha Raja Ganpati Visarjan 2023 Live Streaming Online: लालबागचा राजा गणपती विसर्जन 2023 लाइव्ह स्ट्रीमिंग पाहा ऑनलाइन)

19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता गुरुवारी 'अनंत चतुर्दशी'ला होत आहे. मुंबईतील लालबाग परिसरात हा उत्सव भव्यतेने साजरा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या तेजुकाया आणि गणेश गल्ली मंडळांच्या मूर्तींच्या मिरवणुकीला 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषाने सुरुवात झाली. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्वाधिक भाविकांची गर्दी करणाऱ्या प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मूर्तीची मिरवणूक सकाळी 11.30 च्या सुमारास निघाली. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने लोक मूर्तीच्या शेवटच्या दर्शनासाठी थांबलेले दिसत होते.

लालबागच्या रस्त्यावर आणि गणेशमूर्तींच्या इतर प्रमुख मिरवणुकीच्या मार्गांवर हजारो लोक जमले आहेत. दक्षिण मुंबईतील गिरगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही गर्दी जमली आहे. यामध्ये किल्ला, गिरगाव, माझगाव, भायखळा, दादर, माटुंगा, सायन, चेंबूर आदी भागातील गणेशमूर्तींच्या मिरवणुकांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, उत्सवाच्या सातव्या दिवसापर्यंत अनेक घरगुती, सार्वजनिक मूर्ती आणि गौरी देवीच्या मूर्तींसह तब्बल 1,65,964 मूर्तींचे येथील कृत्रिम तलावांसह विविध पाणवठ्यांमध्ये विसर्जन करण्यात आले.