![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/02/Untitled-design-2021-02-09T125155.123-380x214.jpg)
Navi Mumbai: खारघर (Khargar) मध्ये 3 फेब्रुवारीला पार्क केलेल्या बसमध्ये 19 वर्षीय महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी पीडितेचा मित्र होता. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा पोलिस तपास करत आहेत. आरोपी आणि पीडिता खारघरमधील एकाच इमारतीत राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील 22 वर्षीय आरोपी ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर दुसरा 19 वर्षीय आरोपी पिझ्झा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. पीडित महिलेने तक्रारीमध्ये सांगितलं की, 3 फेब्रुवारी रोजी मुख्य आरोपीने तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर तिला भेटवस्तू खरेदी करण्याचे वचन दिले. मात्र, काही वेळानंतर आरोपींनी दारूच्या दुकानातून दारू विकत घेतली आणि नंतर तिला खारघरच्या उत्कर्ष हॉलजवळ रात्री 10 च्या सुमारास पार्क केलेल्या बसमध्ये नेले. (वाचा - मुंबई: जोगेश्वरीतील हादरवणारी घटना; अयशस्वी प्रेम प्रकरणात तरूणाने प्रेयसीला पेटवलं, तिने मिठी मारताच दोघेही आगीच्या विळख्यात; तरूणाचा मृत्यू मुलीची प्रकृती चिंताजनक)
दरम्यान, इच्छा नसतानाही आरोपींनी तिला मद्यपान करण्यास भाग पाडले. त्यानंतर या आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. तसेच 22 वर्षीय आरोपीने 19 वर्षीय आरोपीला फोन करून घटनास्थळी बोलावले. त्यानंतर 19 वर्षीय आरोपीनेदेखील पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दोन्ही आरोपी पीडितेला बसमध्ये सोडून घटनास्थळावरुन निघून गेले.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिने घरी जाण्यासाठी एका ऑटोरिक्षाची मदत घेतली आणि दुसर्या दिवशी तिच्या कुटुंबाला आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी खारघर पोलिसांकडे संपर्क साधला आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचचं 19 वर्षीय आरोपीला पकडण्यात आले. परंतु, 22 वर्षीय मुलगा सध्या फरारा आहे. पोलिस त्याचा तपास करत आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली होती.