Burn Out | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये जोगेश्वरी परिसरात एकतर्फी प्रेम प्रकरण एका तरूणीसाठी आता जीवन-मृत्यूची लढाई बनलं आहे. यामध्ये तरूणाचा मृत्यू झाला आहे तर तरूणी रूग्णालयामध्ये उपचार घेत आहे. दरम्यान या घटनेमध्ये विजय खांबे याचा मृत्यू झाला आहे. विजय याला मेव्हणाच्या लहान बहिणीसोबत लग्न करायचे होते. त्याबद्दल त्याने कुटुंबासमोर प्रस्ताव मांडला होता पण त्यांनी तो फेटाळला. नंतर विजय दारूच्या नशेमध्ये धुंद राहण्यास लागला.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, विजयचे मेव्हण्याच्या लहान बहिणीशी अडीच वर्ष प्रेमसंबंध होते. पण दारूच्या व्यसनामुळे त्या मुलीनेही विजयसोबत लग्न करणं टाळलं. यामध्ये तरूणीने एकदा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. त्यावेळेस तिच्यावर उपचार करून तिला हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली होती. मात्र नंतर विजय सातत्याने तिला लग्नासाठी हट्ट करत राहिला.

दरम्यान पीडीत तरूणी घरी एकटी असताना विजय तिच्या घरात आला. त्यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी विजयने तरूणीच्या अंगावर पेट्रोलची बाटली ओतून तिला पेटवले. यावेळेस ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. मात्र पेटलेल्या तरूणीने काही वेळातच विजयला मिठी मारली आणि तो देखील पेटला. दोघेही पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडले. त्यानंतर 90% भाजलेला विजय मृत्यूमुखी पडला. तर तरूणीवर उपचार सुरू आहेत. तिची स्थिती गंभीर आहे. दोघांनाही जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. पीडित तरूणीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरुन मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये विजय खांबे विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.