Maharashtra: महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) शहरामधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील 9 जणांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मंगळवारी 4 नागरिकांच्या आत्महत्येची नोंद झाली असून बुधवारी 5 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 8 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिस या आत्महत्यांचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत 9 आत्महत्येच्या घटनांमध्ये 8 जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. तसेच एका व्यक्तीने विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करणार्यांमध्ये 5 मृतांचे वय 31 वर्षाच्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे. या आत्महत्येच्या घटनामागील खऱ्या कारणांचा शोध सध्या नाशिक पोलिस घेत आहेत. (वाचा - मृत मुलाच्या जखमांवर आईकडून रात्रभर उपचार; मुंबई मधील हृदयद्रावक घटना)
लोकांमधील निराशा हे या आत्महत्यांमागील प्राथमिक कारण असल्याचे तपासात समोर आले आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची चिन्ह दिसत आहेत. परिणामी अनेकांचे रोजगार बंद होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये निराशेचं वातावरण वाढण्याची शक्यता आहे.