Mumbai: लायटरचा धाक दाखवत मोबाईलच्या दुकानात 85 हजारांची चोरी; एकाला अटक
Theft (Representative Image- File)

मुंबई (Mumbai) येथे लायटरचा धाक दाखवत मोबाईलच्या दुकानात तब्बल 85 हजारांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंधेरी (Andheri) येथील उच्चभ्रू वस्तीतील स्टाईल शॉप ट्विंकल अपार्टमेंटमध्ये घडला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी एका तरूणाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मोबाईल खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानात आला आणि त्याच्याजवळ असलेली बंदूक दाखवून 85 हजारांचा मोबाईला घेऊन पळून गेला, अशी तक्रार संबंधित दुकानादाराने पोलिसांत दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने दुकानदाराला दाखवलेली बंदूक नसून एक लायटर असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.

दानिश जमिल खान असे आरोपीचे नाव असून तो अंधेरीच्या उच्चभ्रू वस्तीत राहतो. दानिशचे वडील फ्लिमसिटीमध्ये असल्याने त्याच्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यावेळी घरात असलेल्या एका सिगारेट पेटवणाऱ्या पिस्तुलवर त्याची नजर पडली. पिस्तुलीसारखे हुबेहुब दिसणारे लायटर पाहिल्यानंतर कुणालाही ते लायटर आहे? यावर विश्वास बसणार नाही, अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली. दरम्यान, त्याने एका मोबाईलच्या दुकानात चोरी करण्याचे ठरवले. त्यानुसार, दानिश हा जवळच्या एका मोबाईलच्या दुकानात गेला आणि दुकानातील काही मोबाईलबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. अखेर 85 हजार रुपये किंमत असणाऱ्या नवीन मोबाईलबाबत त्याने दुकानदाराकडे विचारपूस केली. थोडा वेळ थांबल्यानंतर त्याने आजुबाजूला पाहिले आणि लगचे मागे खोचलेली बंदूक काढून दुकानदारावर रोखली. तसेच त्याच्या हातात असलेला मोबाईल घेऊन दुकानातून पळ काढला. हे देखील वाचा- Mumbai Local प्रवाशांना दिलासा! लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या पासमध्ये मिळणार मुदतवाढ

दानिश हा दुकानाबाहेर जाताच दुकानदाराने आरडा ओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर दुकानदाराने ओशिवारा पोलीस ठाण्यात धाव घेत हा सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार ओशिवारा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे यांनी तपासाकरता एक टीम तयार केली. मात्र, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांना थोडी अडचण आली. मात्र, दुकानाबाहेरील कॅमेरे पाहून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, मोबाईल चोरीच्या या घटनेचा तपास पोलिसांनी अगदी जलद गतीने केल्याने व्यापारी मंडळातर्फे ओशिवारा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे यांचा आणि ओशिवारा पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे.