पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, उस्मानाबाद जिल्ह्यातील तलमोड गावातील घटना
Maharashtra Police | (PTI photo)

पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झालेल्याने एकच खळबळ आणि संताप व्यक्त होत आहे. ही घटना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उमरगा (Omerga) तालुक्यातील तलमोड येथे तलमोड (Talmod) गावात घडली. दत्तू मोरे (Dttu More) असे या शेतकऱ्याचे नाव असून ते 70 वर्षांचे होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. या घटनेची माहिती कळताच संतप्त गावकऱ्यांनी पहाटे पाच वाजलेपासून मृतदेहासोबत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी मद्यप्राशन करुन ही कारवाई केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर गुन्हा तत्काळ दाखल केल्याशिवया मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत शेतकऱ्याचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतली आहे.

घटनेबाबत माहिती अशी की, सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर एका चार चाकी गाडीचा अपघात दोन दिवसांपूर्वी झाला होता. अपघातानंतर या गाडीने अचानक पेट घेतला. यात दोघा जणांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांची अपेक्षा होती की अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी यावी. मात्र, अग्निशमन दलाच्या गाडीला घटनास्थळी यायाल विलंब लागला. त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला चढवला. (हेही वाचा, पुणे: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन)

पोलीस वाहनावर दगडफेक केल्याबद्दल पोलिसांनी 20 ते 25 अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. तपासात हाती आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरु केले. त्यासाठी बुधवारी मध्यरात्री पोलीस तलमोड गावात पोहोचले. पोलीसांनी झोपेत असलेल्या गावकऱ्यांच्या घराचे दरवाजे तोडत घरात प्रवेश करुन गावकऱ्यांना झोडपण्यास सुरुवात केली. या वेळी झालेल्या मारहाणीतच दत्तू मोरे यांचा मृत्यू झाला, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिस घटनास्थळावरुन निघून गेले. मात्र, गावातील शेकडो ग्रामस्थ (स्त्री, पुरुष) पोलीस ठाण्यात ठिय्या मारुन बसले आहेत. दत्तू मोरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी गावक्रयांनी केले आहे.