सध्या एकीकडे निवडणुका तर दुसरीकडे परीक्षांचे वातावरण आहे. दोन्ही ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासन दक्ष आहे. परीक्षांच्या काळात कॉपीचे प्रकार सर्रास घडतात, असे काही प्रकार आढळले तर त्यावर विद्यालय अथवा महाविद्यालय कठोर कारवाई करत आहे. अशात कॉपी करु दिली नाही, या कारणावरुन परीक्षा विभागप्रमुख प्रा. महेश नामदेव शेजूळ यांना सात विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील मारुतराव घुले महाविद्यालयात या प्रकार घडला आहे.
परीक्षा विभागप्रमुखांनी कॉपी करून दिली नाही, या रागातून विद्यालयाच्या मैदानावर फायटरने या प्राध्यापकांना मारण्यात आले आहे. याबाबत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आता प्रशासन पुढील कारवाई करणार आहे. (हेही वाचा: भाजप प्रदेश अध्यक्षाचा मुलगा ‘कॉपीबहाद्दर’; सापडल्या तब्बल 27 चिठ्ठ्या)
मारुतराव घुले महाविद्यालयात तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाचा पेपर सुरु होता. महाविद्यालयात ब्लॉक नंबर 8 मध्ये प्रा. संदीप नलवडे हे सुपरव्हीजन करत होते. त्यावेळी एक मुलगा मोबाईलच्या मदतीने कॉपी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही माहिती विभागप्रमुख प्रा. शेजुळ यांना दिली. प्रा. शेजूळ यांनी तपासणी केली असता, पहिल्या रांगेतील विद्यार्थी ओंकार राजेंद्र काकडे मोबाइलमधून कॉपी करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी या गोष्टीला मज्जाव केला आणि याच रागातून विद्यार्थ्यांनी प्रा. शेजूळ यांना बेदम मारहाण केली.