Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus: पुणे शहरात (Pune) आज 7 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली असून पुणे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 213 वर पोहोचली आहे. आज नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. याशिवाय पुण्यात आज 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 29 वर पोहोचली आहे.

दरम्यान, आतापर्यंत पुण्यात 26 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यातील 23 रुग्ण हे सह्याद्री नगररोड रुग्णालयातील असून भारती हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयातील प्रत्येकी एक रुग्ण बरा झाला आहे. या सर्व कोरोनामुक्तांना सध्या होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे, असंही मोहोळ यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: मुंबईत आजच्या दिवसात कोरोनाचे 189 नवे रुग्ण आढळल्याने आकडा 1182 वर पोहचला)

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबई शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज कोरोनाच्या 189 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबई शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1182 वर आणि एकूण मृतांची संख्या 75 वर पोहोचला आहे. मुंबई खालोखाल पुणे शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे.