Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती अधिक गंभीर बनत चालल्याने अद्याप लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर आता पुणे (Pune) येथे जवळजवळ 62 गर्भवती महिला कोरोनाची पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या. या महिलांना आता क्वारंटाइन करण्यात आले आहे.

शिकरापूर येथील 62 गर्भवती महिलांचा संपर्क एका सोनाग्राफी करणाऱ्या व्यक्ती सोबत आला होता. मात्र सोनोग्राफी करणाऱ्या व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या सर्व महिला त्याच्यासोबत 6-8 एप्रिल दरम्यान त्याच्या संपर्कात आल्या होत्या. मात्र या महिलांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसून न आल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. पुण्यात कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा 47 वर पोहचला आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रूग्ण होळीच्या पूर्वी आढळला होता. त्यानंतर सातत्याने पुणे शहरात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. पुण्यात आता भवानी पेठ परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाबाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहेत.(Coronavirus: पुणे येथे 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू) 

दरम्यान, महाराष्ट्र राज्याची तीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येनुसार ही विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन , 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. लॉकडाऊन संदर्भात कोणतेही नियम रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये शिथिल केले जाणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.